कायदा बदला अन्यथा कायदे करणारे बदलू – अनंत तरे

पुणे : कायदा बदला अन्यथा कायदे करणाऱ्यांना आम्ही बदलू. 2019 ची निवडणूक जिंकायची असेल तर आदिवासी कोळी समाजाला न्याय द्यावाच लागेल असा सज्जड इशारा महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे यांनी येथे दिला.आदिवासी महादेव कोळी समाजा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि मराठवाड्यातील आदिवासी महादेव कोळी बांधवांचे वैधता जात प्रमाणपत्र पुन्हा तपासणीसाठी स्थापन झालेल्या एस.आय.टी. (विशेष तपासणी चौकशी) च्या माध्यमातून निर्माण झालेले संकट आदिवासी कोळी समाजावर आले आहे. त्या संदर्भात दिशा आणि धोरण ठरविण्यासाठी लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी बैठकीत अनंत तरे बोलत होते.यावेळी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष अॅड.चेतन पाटील, मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर, अॅड.रामचंद्र मेंदाडकर, सिद्धार्थ कोळी, मोहन कडू, शिवाजी नागटीलक, अरविंद कोळी, नरेंद्र निकम, भारती कोळी, जयवंत ठोकळे, मदन भोई, संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख, विलास कुटे यांच्यासह मान्यवर आणि कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोळी समाजातून पुढे आलेले भारताचे नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.तरे म्हणाले की, समाज ज्या ठिकाणी एकत्र येण्याचा प्रयत्न करतो तेथे आम्ही पक्षभेद बाजूला ठवून जातो. समाजासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा आमचा प्रयत्न असतो, त्यासाठी ज्याला यायचं तो आमच्या सोबत येईल, अन्यथा आम्ही सोबत आलेल्यांबरोबर पुढे जाऊ. आम्ही समाजाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

Comments
Loading...