भारताला तोड नाही, ‘चांद्रयान 2’ चे चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा : भारताने आपल्या चांद्रयान 2 या महत्वकांक्षी मोहिमेचा महत्वाचा टप्पा पार केला आहे. चांद्रयान 2 ने आज सकाळी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. इस्रोच्या या मोहिमेचा इथून पुढचा महत्वाचा टप्पा सुरु होणार आहे. कारण 7 सप्टेंबरला चांद्रयान 2 चंद्राच्या भूभागावर उतरणार आहे.

सकाळी 9 वाजून 2 मिनीटांनी चंद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत पोहोचल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी पत्रकार परिषदे घेऊन ही माहिती दिली. यावेळी सिवन म्हणाले की, चंद्रयान 2 ने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. चंद्रयानाला चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी जवळपास 30 मिनीटांचा कालावधी लागला. तसेच चंद्रयान 2 या मोहिमेतील सर्वात कठीण आणि महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. यानंतर आता चंद्रयान दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या तयारीत आहे. येत्या 7 सप्टेंबरला चांद्रयान चंद्रावर उतरेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान श्रीहरीकोटा येथून 22 जुलैला दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी ‘चंद्रयान-2’ चं यशस्वी प्रक्षेपण झालं. त्यानंतर 14 ऑगस्टला चंद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडले. चांद्रयान 2 ने आता महत्वाचा टप्पा पार केला आहे. मात्र आता सर्वात कठीण टप्पा देखील सुरु झाला आहे. चांद्रयान 2 ला चंद्रावर जाण्यासाठी प्रतितास 39,240 किलोमीटर वेगाची आवश्यकता आहे. हवेचा वेग हा आवाजापेक्षा जवळपास 30 टक्के जास्त आहे. त्यामुळे एखादी छोटीसी चूकही चंद्रयान 2 ला धोकादायक ठरू शकते.