‘पक्षाने मला खूप काही दिले, मी रेडिमेड आमदार नाही’; बावनकुळेंचा मिटकरींना टोला

chandrshekhar banwankule - amol mitkari

मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि भिन्न विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यानंतर, भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत झालेला राडा ताजा असतानाच आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटरबॉम्ब’ ने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

९ जून रोजी प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस हे पक्ष आपले कार्यकर्ते फोडत असून आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असं सरनाईक या पत्रात म्हणाले आहेत.

प्रताप सरनाईक यांच्या या पत्रामुळे पुहा एकदा भाजप-शिवसेना युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरवात झाली असून भाजप नेते देखील या चर्चांना हवा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भर म्हणजे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सेना-भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको, असा गौप्यस्फोटच केलाय.

‘प्रताप सरनाईकंच नाही, तर शिवसेनेचे 90 टक्के आमदार, खासदार सरकारवर नाराज आहेत. सरकारमध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचीच कामं होत आहेत. काँग्रेस – राष्ट्रवादी आपला पक्ष मजबूत करतायत, शिवसेना कमजोर होत आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार आणि आमदार या सरकारवर नाराज आहेत. वीज कापल्याने शिवसेना आमदारांवर लोकांचा रोष कायम आहे. त्यामुळे शिवसेना- भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको, असा गौप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार जोरदार टीका केली आहे. ‘बावनकुळे यांनी प्रताप सरनाईक व मविआ सरकारच्या बाबत बोलण्यापेक्षा विधानसभेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट कापून वेशीवर का टांगलं याचं चिंतन करावं . प्रताप सरनाईक यांचं लेटर अनेक अंगानी भाजपलाच डिवचणारं असुन भाजपाच्या राजकीय दहशत वादाचं दर्शन घडवणारं आहे’. असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केली आहे.

त्यानंतर आता बावनकुळे यांनी ट्विट करत अमोल मिटकरी यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘मिटकरी यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, मी भाजपाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्षाने मला खूप काही दिले आहे. मी रेडिमेड आमदार नाही. मी कार्यकर्ता आहे’. असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP