पंचायत समितीच्या सदस्यांसाठी चंद्रकांत पाटलांनी केली ‘ही’ घोषणा

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. याच पार्शवभूमीवर सरकारकडून जनतेसाठी नव नवीन योजना आणल्या जात आहेत. अशातच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीच्या सदस्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

पाटील यांनी कोल्हापूर येथे बोलताना पंचायत समिती सदस्यांना मानधन सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल याबाबत उद्याच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. सर्वसामान्य हिताच्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पंचायत समिती सदस्यांनी नीट पोहचवाव्यात असा आमचा प्रयत्न आहे असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

तसेच पुढे बोलताना पाटील यांनी ‘ज्याप्रमाणे सभापती, उपसभापती यांना मानधन आहे त्याप्रमाणे पंचायत समिती सदस्यांना मानधन मिळायला हवं. त्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. सरपंचांच मानधन ५ हजार रूपये केले आहे. कोतवाल, पोलीस पाटील यांचेही मानधन वाढवलं आहे. तसेच मानधन पंचायत समिती सदस्यांनाही मिळावे यासाठी प्रयत्न करू. त्याचबरोबर त्यांना विकास निधी देण्याबाबतही विचार करू असं पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील यांनी हे विधान केले आहे.