अंतर्गत भांडणात संजय राऊत यांना सरकार पडण्याची भीती वाटते – चंद्रकांत पाटील

chandrakant patil sanjay raut

पुणे : येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सामनातील ‘रोखठोक’ या सदरात संजय राऊत यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. सध्या विधानपरिषदेवरील १२ राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीवरून राज्यात पेच निर्माण झाला आहे. यापूर्वीच्या सदस्यांची मुदत १५ जूनलाच संपली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुचविलेल्या नव्या सदस्यांची निवड झाली असती तर त्यांनी कामाला सुरुवात केली असती. परंतु, सध्या या सदस्यांच्या नियुक्तीसाठी अनुकूल नसल्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत.

हे खरे असेल तर १२ सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. ऑक्टोबरचाच महिना कशासाठी? यावर बाहेर पैजा लागल्या आहेत की, महाराष्ट्रातील सध्याचे सरकार तोपर्यंत पडेल ती किंमत मोजून ऑक्टोबरपर्यंत खाली खेचू. जेणेकरून नंतर येणारे सरकार नामनियुक्त १२ सदस्यांच्या नेमणुका करेल. पण हे केवळ स्वप्नरंजन आहे. सरकारला कोणताही धोका नाही. या राजकारणात राज्यपाला नावाची संस्था नाहक बदनाम केली जात आहे. राज्यपालांच्या नावे परस्पर कोणी हे राजकारण करत असेल तर राज्यपालांनीच ते रोखायला हवे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांच्या दाव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चांगलच फैलावर घेतलं आहे. तिन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या भांडणामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सरकार पडण्याची भीती वाटत आहे. असा टोला चंद्रकात पाटील यांनी लगावला आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा सामनामधून भाजप ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याचा प्रयत्न करेल असा आरोप केला आहे. मुळात राऊत तुम्हाला तिन्ही पक्षांच्या अंतर्गत चाललेल्या भांडणावरून सरकार पडण्याची भीती वाटत आहे, असे संपूर्ण महाराष्ट्राला समजते. ती भीती तुम्ही भाजपच्या नावाने बोलून दाखवत आहात. कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्र अडकला आहे त्यापेक्षा तुम्हाला भाजपवर खोटे आरोप करणे महत्वाचे वाटते का? सरकार पडण्याचा मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो का? असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत केला आहे.

दिवसेंदिवस महाराष्ट्रात कोरोना त्याचे पाश आणखी घट्ट आवळत चालला आहे, कोरोनामध्ये होणारा मृत्युदर वाढतोय. राज्य सरकारचा प्रत्येक प्रयत्न हा गेल्या तीन महिन्यांपासून दिशाहीन असल्याचे संपूर्ण देशाला माहित आहे. तुमच्या सरकारी कार्यकाळात आपले पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी देखील असुरक्षित आहेत. शेतकऱ्यांची बियाणे आणि पुढच्या हंगामातील कर्जाची समस्या तर तुम्हाला सोडवावीशी देखील वाटत नाही. या सर्व चुकांचे आत्मपरीक्षण करून त्या सुधारायच्या सोडून तुम्ही भाजपावर निष्फळ आरोप करत आहात, असे पाटील यांनी म्हटले आहे.