fbpx

गुरूने जशी माघार घेतली, तीच संधी शिष्याला, चंद्रकांत पाटलांचा संजय शिंदेंना टोला

टीम महाराष्ट्र देशा : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांना टोला लगावला आहे. माढा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी ‘गुरूने जशी निवडणुकीतून माघार घेतली आहे तशीच संधी शिष्याला अजूनही आहे’ अशा शब्दात त्यांनी संजय शिंदे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असं जाहीर केलं होतं. परंतु काही काळानंतर एकाच घरातून तीन-तीन उमेदवार नको असं कारण देत त्यांनी माढ्यातून माघार घेतली होती. याचाच संदर्भ देत चंद्रकांत पाटलांनी संजय शिंदे यांना टोला लगावला आहे.

यापूर्वीही चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली होती, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला उद्धवस्त करुन शरद पवार यांचे राजकारणच संपवणार असल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला होता.

माढा लोकसभेचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस कमकुवत झालेली दिसत आहे. अशातच संजय शिंदे आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्यात होणारी लढत प्रतिष्ठेची असणार आहे.