‘पवारांच्या पे रोलवर राहून बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’

sanjay raut chandrkant patil

मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि भिन्न विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यानंतर, भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत झालेला राडा ताजा असतानाच आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटरबॉम्ब’ ने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

९ जून रोजी प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस हे पक्ष आपले कार्यकर्ते फोडत असून आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असं सरनाईक या पत्रात म्हणाले आहेत.

या पत्रावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या पत्रावर प्रतिक्रिया देत विनाकारण त्रास कोण ? कशासाठी ? देतोय हे महत्वाचं आहे. विनाकारण होणारा त्रास त्यांना सहन होत नसेल, म्हणून त्यांनी ते पत्राद्वारे व्यक्त केलं असेल, असं आहे. तर राज्यातील आघाडी सरकार ५ वर्षे चालणार असल्याचा देखील पुनरुच्चार केला आहे.

संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘शिवसेना-भाजपची युती नैसर्गिक आहे. त्यावर बोललं पाहिजे. पवारांच्या पे रोलवर राहून पवारांची बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडल्या पाहिजे. आम्हाला हिंदुत्व पाहिजे. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही आहोत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला तोच संदेश दिला आहे. पूर्वीच्या युतीत आम्ही समाधानी होतो. आताची युती नैसर्गिक नाही, अशा शिवसैनिकांच्या भावना आहेत. त्या राऊतांनी मांडल्या पाहिजेत’, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या