मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी समित्या महाविकास आघाडी सरकारने स्थापन केल्या होत्या, याबाबत जलसंधारण विभागाने नुकताच अहवाल दिला असून त्यात जलयुक्त शिवार योजनेत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हणत फडणवीसांना क्लीन चीट देण्यात आलीआहे. उलट जलयुक्त शिवार योजनेमुळे पीक पेरणी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, आता क्लीन चीट मिळाल्यानंतर भाजपनेते चांगलेच आक्रमक झाले असून भाजपने राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले, फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवलेल्या जलयुक्त शिवार अभियानावर आजपर्यंत ठाकरे सरकारने अनेक आरोप केले. अखेर आज सरकारच्याच जलसंधारण विभागाने क्लिन चिट देऊन या अभियानामुळे शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारल्याचे सांगीतले आहे. शेतकऱ्यांचे हित साधणाऱ्या देवेंद्रजींना तुम्ही इतके दूषण दिले, मात्र ‘सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं’, हे ठाकरे सरकारचे नेते विसरले. राज्यातल्या लाखो शेतकरी बांधवांचा विश्वास आमच्यासोबत आहे. याच कारणाने शेतकऱ्यांचा विकास हा एकच ध्यास फडणवीस सरकारसमोर होता.
पुढे ते म्हणाले, जलयुक्त शिवारअंतर्गत केलेल्या कामांमुळेच खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचनाची सुविधा झाली. काम झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नगदी पिके घेतली. त्यांचे उत्पादन वाढले. साठवणूक झालेल्या पाण्याचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वापर केला. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले ? पीक पेरणी क्षेत्र सुधारण्यासाठी, जमिनीच्या पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध समस्या दूर करण्यासाठीच देवेंद्रजींनी ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली आणि ती यशस्वी झाली. आम्ही केवळ विकासाचे राजकारण करतो, ठाकरे सरकारप्रमाणे सुडाचे राजकारण करत नाही.
आम्ही सत्तेत असताना तुमच्यासारखे घोटाळे आणि भ्रष्टाचार केला नाही. राज्याची जनता, शेतकरी, कामगार सर्व कोणत्या सरकारमध्ये सुखी होते, ते आज सिद्ध झाले! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जरा देखील मदत करू न शकणारे जलयुक्त शिवार योजनेवर बोट ठेवतात, हेच हास्यास्पद आहे असा टोला देखील पाटील यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- ‘पुणेकरांनी कररूपाने महापालिकेला दिलेला पैसा स्मार्ट सिटीला देण्याचा काय संबंध ?’
- पुढील काही महिन्यात थंडी वाढणार; मात्र पुणेकरांना थंडीची प्रतीक्षा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<