भाजपच्या राखी कंचर्लावार चंद्रपूरच्या नव्या महापौर

टीम महाराष्ट्र देशा : भाजपच्या राखी कंचर्लावार चंद्रपूरच्या नव्या महापौर निवडून आल्या तर राहुल पावडे यांची उप महापौरपदी निवड झाली. कंचर्लावार व पावडे यांना प्रत्येकी ४२ तर काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवार कल्पना लहामगे व उपमहापौर पदाचे उमेदवार अशोक नागपूर यांना प्रत्येकी २२ मते मिळाली. तर तिकडे अमरावतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापालिकेच्या १६ व्या महापौर , उप महापौरपदाची आज हात उंचावून निवडणूक पार पडली. यामध्येही भाजपची सरशी दिसून आली. महापौरपदी चेतन गावंडे, तर उपमहापौरपदी कुसूम साहू यांची निवड झाली. त्यांना प्रत्येकी ४९ मते पडलीत.

या निवडणुकीत शिवसेनेचे सदस्य तटस्थ राहिलेत. महाशिवआघाडाचा प्रयत्न फसल्याने काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार विलास इंगोले व प्रदीप हिवसे यांनी माघार घेतली. महापौरपदासाठी एमआयएमचे नगरसेवक हुसेन यांना २३ मते, बसपचे माला देवकर यांना ५ मते पडली.

महापौर पदाच्या निवडणुकीचे इतर अपडेट
राज्यातील प्रमुख महानगरपालिकांचे महापौर आज निवडले जात आहेत. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळ यांची महापौरपदी निवड झाली आहे. शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.

दरम्यान, राज्यातल्या बदलेल्या सत्तासमीकरणांचे पडसाद राज्यात इतरत्र उमटायला सुरुवात झाली आहे. याचा प्रत्यय लातूर महापालिकेत आला आहे. भाजपचे स्पष्ट बहुमत असलेल्या लातूर महानगरपालिकेत सत्तांतर घडून आले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे निवडून आलेत. भाजपचे नगरसेवक फुटले आणि काँग्रेसच्या पारड्यात मते पडली. हात उंचावून झालेल्या मतदानात काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांना ३५ तर भाजपच्या शैलेश गोजमगुंडे यांना ३३ मते मिळाली. भाजपसाठी हा मोठ्ठा धक्का मानला जात आहे.

तर दुसऱ्या बाजूला राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकासआघाडीचे समीकरण जुळत असताना नाशकात महापौर, उपमहापौर निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना, भाजप नगरसेवक फोडणाऱ्या बाळासाहेब सानप यांनी ऐनवेळी तलवार म्यान करत माघार घेतल्याने नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी यांची तर भीखुबाई बागुल यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे.

महत्वाच्या बातम्या