केशवराज बाबासाहेब महाराजांचे नववे वंशज चंद्रकांत सुभेदार यांचे पुण्यात निधन

परभणी : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचे नववे वंशज आणि नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक चंद्रकात विष्णूपंत सुभेदार ( 77) यांचे सोमवारी सकाळी नऊ वाजता पुणे येथे निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात पत्नी रजनी, मुलगी शिल्पा, क्षितीज, स्वप्नील दोन मुले, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सेलूच्या नूतन विद्यालय शिक्षण संस्थेत विद्यार्थी ते मुख्याध्यापक असा सुभेदार यांचा प्रवास होता. त्यांनी ३३ वर्षे शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सेवा बजावली.
अभ्यासपूर्ण उपक्रमांसोबतच क्रीडा कौशल्य व गुणवत्ता विकासाच्या उपक्रमांवर  अधिक भर दिला. संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षाचे संयोजक म्हणून विविध उपक्रमांच्या आयोजन केले होते. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांसह नोव्हेंबर 2002 मध्ये राष्ट्रपती भवनात त्यांनी भेट घेतली. पन्नास मिनिटांच्या या भेटीत विद्यार्थी, शिक्षक व डॉ. कलाम यांच्यात सुसंवाद घडवून आणला. सुभेदार यांना 1993 मध्ये जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवले होते. सेवानिवृत्ती नंतर ते पुण्यात वास्तव्यास होते.