fbpx

इंदापूर, भोर-वेल्ह्यात भाजपसाठी अदृश्य शक्ती काम करत आहेत : पाटील

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील विजयासाठी इंदापूर आणि भोरमध्ये अदृश्य शक्ती काम करत आहेत, असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले की, पुरंदर, खडकवासला आणि दौंडमध्ये भाजपला चांगले समर्थन मिळत आहे. तर इंदापूर आणि भोरमध्ये अदृश्य शक्ती भाजपसाठी काम करत आहेत. मात्र, बारामतीमध्ये अजून काम करावे लागणार आहे. त्यामुळे मी स्वतः शेवटचे ३ दिवस बारामतीमध्ये तळ ठोकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पाटील यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या इंदापूर आणि भोरमध्ये नेमक्या कुठल्या शक्तींना भाजपने आपल्याकडे वळवले आहे, यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी बोलताना महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी आपली आगामी रणनीती स्पष्ट केली. चांगला दिवस पाहून पाच हजार कार्येकर्ते घेऊन बारामती मतदार संघात प्रचारात उतरणार. बारामती मतदार संघातील निवडणुक ही सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल मध्ये नसून ही निवडणूक देश तोडणारे आणि देश जोडणारे यांच्यामध्ये आहे असं म्हणत आघाडीवर तोफ डागली.

त्याप्रमाणेच बारामती ही कुणाची जहागीर नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेसने लक्षात ठेवावे, अशा शब्दांत  भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी पवार कुटुंबावर टीका केली आहे.