चंद्रकांत पाटलांच्या मेळाव्यात महिलांबरोबर झाली छेडछाड

blank

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात महिलांबरोबर छेडछाड झाल्याचे वृत्त समोर येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र या मेळाव्यात महिलांबरोबर अनुचित प्रकार घडला आहे. या मेळाव्यात आमच्यासोबत छेडछाड झाली, असा आरोप भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसंच हे प्रकरण बाहेर येऊ नये, यासाठी काहींनी दबाव आणल्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप देखील या महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

महिला पदाधिकारी म्हणाल्या की, चंद्रकांत पाटलांना भेटण्यासाठी गेलो असता काही लोकांकडून गर्दीचा फायदा घेऊन महिला पदाधिकाऱ्यांच्या साड्यांचे पदर ओढणे, चिमटे काढणे असे गैरवर्तन झाल्याचा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केला आहे. तक्रार केल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याबाबत महिला पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहीली आहे.

वाचा काय आहे पोस्ट

नमस्कार, अतिशय संतापाने मी हा मेसेज ग्रुपवर टाकत आहे .कालच्या शिवशंकर सभागृहात आमच्या बाबतीत जो फालतू प्रकार झाला त्याचा मी जाहीर निषेध करते . काल सभागृहात अध्यक्ष मा .श्री चंद्रकांतदादांना भेटण्यासाठी आम्ही उभे होतो तेव्हा गर्दीत कुणीतरी तरी माझा पदर जोरात मुद्दाम खेचला. ही अतिशय संतापजनक बाब आहे. माझ्याबरोबर असलेल्या दुसऱ्या महिला पदाधिकाऱ्यालाही जोरात चिमटा घेतला. गर्दीत चेहरे आमच्या लक्षात आले नाहीत. भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे की होता, असा प्रश्न काल मनात आला. जर महिलांची सुरक्षितता इथे जपली नाही तर काय उपयोग पक्षातील पुरुष पदाधिकाऱ्यांचा? काल आमच्या बाबतीत जे घडले ते इतर कुणाच्या बाबतीत घडू नये म्हणून मी मेसेज टाकत आहे. हा विषय आपले आमदार व सरचिटणीस बाबाशेठ यांच्या कानापर्यंत जावा हे महत्त्वाचे. आपल्या मतदारसंघात महिलांची योग्य दखल घेतलीच पाहिजे. कारण सगळ्या महिला प्रामाणिकपणे काम करतात कशाचीही अपेक्षा न ठेवता. अतिशय खेद वाटतो मला काल जो प्रकार आमच्या बाबतीत झाला तो आपल्याच मतदारसंघात. आम्ही जेव्हा प्रकार तिथे उभे असलेल्या काही मान्यवरांना सांगितला तेव्हा ‘जावू दया सोडून दया. पत्रकार आहेत इथं. उगीच विषय वाढेल. पक्षाचे नाव जाईल असे सांगितले गेले. अशा मनोवृत्तीचा मला अतिशय संताप आला आहे.’