fbpx

अजित पवारच काय जयंत पाटलांचा देखील पराभव करणार : चंद्रकांत पाटील 

टीम महाराष्ट्र देशा : अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा देखील वाळवा विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार पराभव करणार, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगली येथे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे प्रतिपादन केले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवार यांचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला माढा, कोल्हापूर आणि हातकणंगले हे लोकसभा मतदारसंघ युतीने उद्ध्वस्त केले आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकीत पवारांच्या बालेकिल्ल्याची निशाणीही ठेवणार नाही. तसेच वाळवा विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील यांचा देखील  भाजप निश्चित पराभव करणार असल्याचा  विश्वास त्यांनी  व्यक्त केला.

दरम्यान चंद्रकांत पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रसेच्या नेत्यांच्या मागे लागल्याचे दिसत आहेत. याआधी बारामतीत अजित पवार यांचा देखील पराभव करु असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने बारामतीमध्ये तळ ठोकणार आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. पाटील यांनी लोकसभे पाठोपाठ विधानसभेसाठी देखील पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.