खड्डेमुक्त रस्ते मोहिमेत कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई –चंद्रकांत पाटील

15 डिसेंबर पूर्वी प्रमूख रस्त्यांवरील खड्डे बुजविणाऱ्या अधिकाऱ्यांचा होणार सन्मान

जळगाव : जळगाव जिल्ह्यात खड्डेमुक्त रस्ते मोहिम यशस्वी करण्यासाठी येत्या 15 डिसेंबरपर्यंत सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी संबंधित यंत्रणेने अधिक गतीने कामे पूर्ण करावीत. जे अधिकारी आपल्या कामात कसूर करतील त्यांचेवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असून जे अधिकारी वेळेत काम पूर्ण करतील त्यांचा विभागाच्यावतीने सन्मान करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिला आहे .

खड्डेमुक्त रस्ते मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हयातील रस्त्यांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी आज येथील अजिंठा विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता गायकवाड, मोराणकर यांचेसह विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हयातील राष्ट्रीयमार्ग, राज्यमार्ग, प्रमूख जिल्हा मार्गांची परिस्थिती, त्यावरील खड्डयांची परिस्थिती, किती किलोमीटर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले, किती कामे अपूर्ण आहे याचा उपविभागनिहाय आढावा घेऊन अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ज्या अधिकाऱ्याच्या उपविभागातील कामे अपूर्ण आढळून येतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर जे अधिकारी वेळेत कामे पूर्ण करतील. त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी उपस्थितांना सांगितले. आपल्या विभागातील कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी पूर्ण कार्यक्षमतेने कामे करावीत. प्रसंगी आपली कार्यक्षमता वाढविण्याचाही सल्ला दिला.

15 डिसेंबर पूर्वी प्रमूख रस्त्यांवरील खड्डे बुजविणाऱ्या अधिकाऱ्यांचा विभागातर्फे सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांची निवड करण्याकरीता या अधिकाऱ्यांना ज्या भागातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यात आले आहे त्या भागातील पाच व्यक्तींचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. यामध्ये गरोदर महिला, वृध्द व्यक्ती, महाविद्यालयीन विद्यार्थीनी, संबंधित गावाचा सरपंच आणि एका सामाजिक संस्थेचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. एका जिल्हयातील 50 अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असून अधिकाऱ्यांची निवड करण्याचे अधिकार मुख्य अभियंता यांना देण्यात आल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या विविध विकास कामांची प्रलंबित बिले येत्या जानेवारी अखेर देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्र्यांनी म्हणाले की, नागरिकांना चांगल्या रस्त्यांची सुविधा मिळण्यासाठी मंजूर कामांच्या निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करुन काम सुरु करण्याचे आदेशही कंत्राटदारांना वेळेत दिले गेले पाहिजे. जेणेकरुन वेळेचा अपव्यय होणार नाही असेही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.

You might also like
Comments
Loading...