चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार? संजय राऊतांचे मोठे विधान

chandrkant patil

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल असे म्हणत राज्यभर खळबळ उडवून दिली होती. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत दादा हे आमचे मित्र आहेत. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. ते म्हणाले माजी मंत्री म्हणू नका.चमत्कार होणार आहे.चंद्रकांतदादा अवतारी पुरुष आहे. चमत्कारी पुरुष आहेत. ते काही तरी चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्याची त्यांची वेदना समजू शकतो. मात्र मी त्यांना निरोप पाठवला आहे. तुम्हाला अजून २५ वर्षे माजी मंत्री म्हणूनच राहावे लागेल. कारण उद्धवजींच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार पुढील २५ वर्षे कायम राहणार आहे. त्यामुळे त्यांनी मनाची तयारी ठेवावी. . स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. तसेच ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना अशी ऑफर आली असं माझ्या कानावर आलं आहे. त्यामुळे त्यांना माजी म्हणून घ्यायचं नसेल, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान चेंबूरमध्ये एका कार्यक्रमात बोलतांना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाष्य केले. ते म्हणाले की,मी स्वत: पाटलांना फोन करुन पुढचे पंचवीस वर्षे तुम्ही माजी मंत्रीच असाल असे चंद्रकांत पाटलांना सांगितले’. तसेच पुढे बोलताना आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही. स्वबळावर सत्ता हवी तर शिवसेनेला १५० जागा हव्यात आम्ही कुणाच्या पाठीत वार करत नाही. तसेच शिवसेना असंख्य वार आणि घाव सहन करत इथपर्यंत पोहोचली आहे. ही शिवसेना त्यागातून संघर्षातून समोर आलेली आहे.’ असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, पिंपरी चिंचवड जवळील देहूगाव येथे एका खाजगी कार्यक्रमात मंचावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला तेंव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावरच संजय राऊत यांनी ते नागालँडचे राज्यपाल होणार अशी शक्यता असल्याचे त्यांनी वक्तव्य केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या