‘…नाहीतर जयंत पाटलांची सुट्टी केली असती’; राजकारणातील दोन पाटील आमने-सामने

jayant patil vs chandrakant patil

कराड : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

कोरोना काळातील टाळेबंदीनंतर राज्यातील ही पहिलीच निवडणूक असल्यानं सर्वांचं लक्ष्य या निवडणुकांकडे लागलं असतानाच राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील वेग घेऊन लागले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून पक्षांनी बैठकांचं सत्र सुरु केलं आहे. अनेक बडे नेते यामुळे राज्य पालथं घालताना दिसत आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना छोटे नेते म्हणून संबोधल्यानंतर राष्ट्रवादी देखील आक्रमक झालेली पाहायला मिळालं. काल, कराडमधील कार्यकर्त्यांस मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली आहे.

त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांना आव्हान देत टोला लगावला आहे. “गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मी कोथरुडला अडकलो होतो. त्यामुळे इस्लामपुरात जास्त लक्ष देता आलं नाही. नाहीतर इस्लामपुरात जयंत पाटील यांची सुट्टी केली असती मग ते केवळ तालुक्याचे नेते राहिले असते,” असा घणाघात त्यांनी केल्यामुळे जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही पाटील आमने-सामने आल्याचं दिसून येत आहे.

चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा – जयंत पाटील

‘देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी कधी टरबुज्या म्हणत नाही. चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे. त्यांनी राग मानून घेऊ नये,’ असा चिमटा जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटील यांचा काढला होता.

महत्वाच्या बातम्या