‘शरद पवार अभ्यास नसलेले छोटे नेते’ : चंद्रकांत पाटील

sharad pawar vs chandrakant patil

पुणे : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

कार्यकर्त्यांच्या सभा, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या योजना, नेत्यांचे दौरे, बैठका यामुळे राजकीय वातावरण तापलं असून कोरोनानंतरच्या राज्यातील या पहिल्याच निवडणुका आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी पुण्यात आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली. ‘राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,’ अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

तर, ‘देवेंद्र फडणवीस अत्यंत अभ्यासू नेते आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली आहे. यासाठी त्यांनी खोलात जाऊन कायद्याचा अभ्यास केला आहे. मराठा समाज ओबीसीमध्ये घुसूच शकत नाही, याची व्यवस्था केली आहे. मात्र, राजकारणासाठी काही लोक आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजांमध्ये अंतर निर्माण करण्याचे काम करीत आहेत. राजकारणासाठी समाजात विष कालवण्याचे काम करणाऱ्यांचा शर्ट धरला पाहिजे,’ असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या