महाविकास आघाडीचे फसवे आकडे, भाजपचाच…; चंद्रकांत पाटलांचा दावा

महाविकास आघाडीचे फसवे आकडे, भाजपचाच…; चंद्रकांत पाटलांचा दावा

Chandrakant Patil and Mahavikas Aghadi

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये सध्या कलगितुरा रंगला आहे. महाविकास आघाडी सरकारने खोटे आकडे सांगितले असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. ‘महाविकास आघाडीच्या 280 मतदार पाठीशी असल्याच्या दाव्यात तथ्य नाही. भाजपच्या पाठीशी विजय साध्य करण्याइतकी मते असून ते निकालातून स्पष्ट होईल’, असे स्पष्ट करून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर विधान परिषदेत भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा विजय निश्चित असल्याचा निर्वाळा शुक्रवारी दिला आहे.

आमदार पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक यांनी आजपासून संपर्क दौरा सुरू केला आहे. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ‘सतेज पाटील यांना आपल्याला 180 नव्हे तर 425 सदस्यांचा पाठिंबा आहे असे म्हणायचे असेल, अशा शब्दांत खिल्ली उडवली. आघाडीचा दावा आकडेवारीवर टिकणारा नाही. काँग्रेसचे जिल्ह्यात चिन्हावर निवडून आलेले 36 असून राष्ट्रवादीसह 118 सदस्य आहेत. भाजपचे 105 सदस्य असून प्रकाश आवाडे, विनय कोरे या आमदारांसह सहयोगी सदस्यांचे मिळून 186 मते आहेत. फुगीर आकडे सांगून विजय मिळत नाहीत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

भाजपला विजयासाठी 43 मतांची गरज असून त्याची जुळणी केली असल्याचा दावाही त्यांनी केला. जिल्ह्यात शिवसेनेने कधीही भाजपला मदत केली नव्हती. गतवेळी शिवसेनेची मते आम्हाला मिळत नव्हती. यावेळी काही मते मिळतील याबाबत आशावादी आहोत, असे चंद्रकांत पाटील स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या: