कल्पनाविलासातून आरोप करण्यापेक्षा चौकशी करून कारवाई करा : चंद्रकांत पाटील 

टीम महाराष्ट्र देशा: राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून रोज नवनवे विषय काढून कल्पनाविलास चालू आहे. पण या सरकारने नुसते आरोप करण्यापेक्षा त्यांची कालबद्ध चौकशी करून कारवाई करावी, असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून दररोज सरकारचा कल्पनाविलास सुरु आहे. फोन टॅपिंग प्रकरण, कोरेगाव भीमा प्रकरण, छत्रपती शिवाजी स्मरकात कॅगने ठेवलेला ठपका असे विषय काढून नुसते आरोप करणे सुरू आहे. त्यापेक्षा राज्य सरकार चौकशी का करत नाही?

फोन टॅपिंग प्रकरणी माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनाही श्री. पाटील यांनी यावेळी लक्ष्य केलं. ते म्हणाले की,या प्रकरणावरुन दीपक केसरकर सोईची भूमिका घेत आहेत. वास्तविक गृह राज्य मंत्र्यांनाही अधिकार आणि माहिती असते. त्यामुळे यावर आरोप्रत्यारोप करण्यापेक्षा सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी.

कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे सोपवणं, हा केंद्र सरकारचा अधिकार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
एका प्रश्नाच्या उत्तरात मा. पाटील म्हणाले की,मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणं हा आमच्यासाठी आनंदच आहे. देशात परिवर्तनासाठी हिंदुत्वाचा पुरस्कार करणं यात काहीच गैर नाही.