fbpx

हायब्रीड न्यूईटी मॉडेलच्या रस्त्यांवर टोल नाही – चंद्रकांत पाटील

chandrakant patil new

नागपूर : राज्यात हायब्रीड न्यूईटी मॉडेलच्या माध्यमातून 10 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम सुरु करणार असून त्यावर कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

राष्ट्रवादीचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथील बाह्यवळण मार्गाची दुरावस्था झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते. मुंब्रा येथील रस्ता बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर तयार करण्यात आला होता. त्याचा कालावधी समाप्त झाल्याने या मार्गावरील टोल बंद झाल्यामुळे रस्ता दुरुस्तीचे काम थांबले आहे.

या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्याचे काम सुरु आहे. दरम्यान पुर्वीच्या ठेकेदारासोबत 18 किंवा 19 डिसेंबर रोजी बैठक घेऊन रस्ता दुरुस्तीबाबत निर्णय घेण्यात येईल.

यावेळी आ. अजित पवार यांनी विचारलेल्या एका उपप्रश्नाला उत्तर देताना राज्यातील 53 टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोल बंद केला असून मोठ्या वाहनांकडून टोल वसूली केली जात आहे. राज्यात यापूढे मोठ्या वाहनांसाठी टोल लावण्यात येणार असून सर्व सामान्य वापरत असलेले किंवा त्यातून प्रवास करीत असलेल्या छोट्या वाहनांना टोल वसूल केला जाणार नाही, असे स्पष्ट केले.