वादळाच्या नुकासानाचे पंचनामे सुरू- चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil on Okhi cyclone issue

नागपूर : राज्यातील ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असून नियमानुसार त्यांना मदत देण्यात येईल, असे महसूल, मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, सोमवारी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषदेत सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.

यासंदर्भात पाटील म्हणाले की, राज्यातील रायगड, रत्नागिरी, नाशिक जिल्ह्यात ओखी वादळामुळे नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यात रब्बी हंगामात सुमारे 300 हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झालेल्या कडधान्य व भाजीपाला पिकांचे प्राथमिक अहवालानुसार नुकसान झाले आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ओखी चक्रीवादळामुळे रत्नागिरी तालुक्यातील जाकीमिऱ्या येथील 52 मच्छिमारांची जाळी वाहून गेल्याने अंदाजे 43.26 लाख रुपयांचे नुकसान झालेले असून यासंबंधी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांचेमार्फत पंचनामे करण्यात येत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील नाशिक, निफाड, दिंडोरी, चांदवड व सटाणा या तालुक्यात ओखी चक्रीवादळामुळे प्राथमिक अहवालानुसार सुमारे 1 हजार 36 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष व इतर पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. यासोबतच ओखी चक्रीवादळामुळे राज्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असून आपद्ग्रस्तांना नियमानुसार मदत देणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.