मराठा समाजातील मुलांसाठी 10 वस्‍तीगृहे सुरू करणार- चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्‍यासाठी सरकारने जे इतिहासकालीन संदर्भ व सर्वेक्षण अहवाल व संबधित आकडेवारी गोळा केली आहे व ती मागासवर्गीय आयोगासमोर ठेवण्‍यात आली, त्‍यावरील कायदेशीर प्रक्रिया 31 मार्च 2018 पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्‍याची विनंती आयोगाला करण्‍यात येईल, अशी ग्‍वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

यासंदर्भात गुरुवारी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना आ. आशिष शेलार यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. आरक्षण देण्‍यासाठी सरकारने इतिहासकालिन पुरावे आणि (कॉन्‍टी‍फायेबल डेटा, हिस्‍टॉरिकल रेफरन्‍स ) सर्वेक्षण अहवाल व संबंधित आवश्‍यक माहिती गोळा करण्‍याचे कामही केले आहे. ही माहिती मागासवर्गीय आयोगाकडे सादर करून त्‍याबाबत आवश्‍यक असणारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्‍यक आहे. ही प्रक्रिया वेळीच पूर्ण झाल्‍यास पुढील आरक्षणाचे मार्गही वेळेत खुले होतील.

त्‍यामुळे ही प्रक्रिया 31 मार्च 2018 पर्यंत पुर्ण करण्‍यात यावी यासाठी सरकार मागासवर्गीय आयोगाला विनंती करेल काय, असा प्रश्‍न त्‍यांनी केला. तर सरकारने मराठा क्रांती मोर्चाची मागणी मान्‍य करून राज्‍यात जिल्‍हा पातळीवर मराठा समाजातील मुलांसाठी वस्‍तीगृहे सुरू करण्‍याचे मान्‍य केले होते. त्‍यानुसार केवळ सोलापूर येथेच वस्‍तीगृहाचे काम सुरू झाले असून अन्‍य जिल्‍ह्यांमध्‍येही सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सरकारकडून काम सुरू करण्‍यात यावे अशी विनंती आमदार शेलार यांनी सरकारला केली.

त्‍याला उत्‍तर देताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्‍हणून आपण सतत प्रयत्‍न करीत असून गेल्‍याच आठवडयात रविवारी अधिवेशनाचे कामकाज नसताना आपण दिवसभर दहा माजी न्‍यायाधिश व विधीतज्ञांची मुंबईत भेट घेऊन याविषयी काही सूचना व माहिती गोळा केली आहे. ही माहिती व सुचना त्‍यांच्‍या मार्गदर्शनानुसार पुढील कामात त्‍यांचा वापर करणार आहोत. तसेच शेलार यांनी विनंती केल्‍याप्रमाणे आम्‍ही मागासवर्गीय आयोगाकडे जाऊन त्‍यांना आरक्षणाबाबतच माहितीवरील कायदेशीर प्रक्रिया 31 मार्च पर्यंत पुर्ण करण्‍याची विनंती करू. तसेच दहा मोठया जिल्‍हयांच्‍या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या इमातींमध्‍ये बदल व डागडूजी करून मराठा समाजातील मुलांसाठी वस्‍तीगृह जून पुर्वी सुरू करण्‍याबाबत कार्यवाही करण्‍यात येईल, असेही मंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले.