fbpx

मराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

औरंगाबाद : “मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मागासवर्ग आयोगाचा अहवालात सकारात्मक आहे. त्यावर अभ्यास सुरु आहे. आरक्षण न्यायालयात टिकवणार, त्यासाठी वकिलांची मोठी फौज तयार आहे. आता मोर्चे आणि आंदोलन करण्यापेक्षा काय हवं आहे हे सांगायला पाहिजे”, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादेत सांगितलं.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?

“गेल्या 40 वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी होत आहे. मागास ठरवल्याशिवाय आरक्षण मिळत नाही. मराठा आरक्षणासाठी अनेक आयोग स्थापन झाले, मात्र कोणत्याही आयोगाने मराठा समाजाला मागास म्हटलं नाही. जोपर्यंत आयोग कोणत्याही समाजाला मागास म्हणत नाही, तोपर्यंत आरक्षणच मिळत नाही. आधीच्या सरकारने नारायण राणेंची समिती नेमली, मात्र कोर्टाने मराठा आरक्षण फेटाळलं. आमच्या सरकारने मागास आयोग नेमला, दोन वर्ष या आयोगाने खूप काम केलं. अभ्यास करुन मागास आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. मुख्य सचिवांकडे हा अहवाल आहे. ते अभ्यास करुन हा अहवाल सोपवतील.

आम्ही मागास आयोगाला जी काही माहिती पुरवली आहे, त्यावरुन आम्हाला विश्वास आहे की या आयोगाने मराठा समाजाला मागास म्हटलं असेल. जर मागास म्हटलं असेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळणं सोपं होणार आहे. हे आरक्षण इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकार देईल. त्याचा सर्व कायदेशीर अभ्यास सरकारने केला आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार, त्यासाठी वकिलांची फौज उभा करु”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.