‘चंद्रकांत पाटील त्यांच्या मतावर कधीही ठाम नसतात’; ‘वाघासोबतच्या मैत्री’वरून खडसेंची कोपरखळी

जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकांतात भेट घेतल्यापासून राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ‘उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत,’ असं विधान करून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा ‘युती’चे संकेत दिलेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ‘चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो.’

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. पाटील हे आपल्या मतावर कधीही ठाम नसतात. त्यांची मते दररोज बदलत असतात, अशा शब्दांत खडसे यांनी चिमटा काढला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन साजरा होत आहे. एकनाथ खडसे गुरुवारी सकाळी जळगावात आलेले होते. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर त्यांनी आपल्या मुक्ताई निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. ‘चंद्रकांत पाटील मतावर कधीही ठाम नसतात. त्यांची मते दररोज बदलत असतात. त्यांनी आजपर्यंत ठामपणे भूमिका घेतलेली नाही. आता सांगितले, नंतर बदलले, असा आजवरचा माझा अनुभव राहिला आहे. त्यांना मैत्री करायची असेल तर त्यांनी करावी, त्यांच्याकडे जावे’, असे खडसेंनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

IMP