दसऱ्याचं भाषण होतं की शिमग्याचं? चंद्रकांतदादांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

chandrakant patil

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. राज्यातली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.

दरम्यान, आज मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवलाय. ज्याला कुणाला खुमखुमी आली असेल तर त्यांनी आजमावून पाहा. तुम्ही जर आमच्या वाटेला आलात तर तुम्हाला धडा शिकवला जाईल असा इशारा देखील विरोधकांना काल ठाकरे यांनी दिला. मुंबई, बिहार ते दिल्ली अशा सर्वच ठिकाणी उभ्या राहिलेल्या बाहुल्या, रावणी, काळी टोपी आणि बेडकी अशा उपमा देत विरोधकांना त्यांनी अक्षरशः सोलून काढले.

उद्धव ठाकरेंच्या या भाषणाची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. हे दसऱ्याचं भाषण होतं की शिमग्याचं?, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. दसरा मेळाव्याचं भाषण म्हणजे शिमग्याचं भाषण होतं. काय ही भाषा. जरा तुमच्या भाषेचा विचार करा, असा टोला लगावतानाच या भाषणातून महाराष्ट्रातील कोणत्याच विषयावर काहीच बोलले नाही. भाषणात एकच मुद्दा होता तो म्हणजे भाजप, असा चिमटा पाटील यांनी काढला.

महत्वाच्या बातम्या