महाराष्ट्रातील कॉंग्रेस संपत चालली आहे : चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र : माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली. ‘ज्या राज्यात वसंतदादा पाटील यांनी कॉंग्रेसला उभे केले त्याच राज्यात कॉंग्रेस संपत चालली आहे, त्यामुळेच वसंतदादांच्या नातवाला स्वभिमानीची बँट हाती घ्यावी लागली आहे’ अश्या शब्दात त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.

कॉंग्रेसचे नेते प्रतिक पाटील यांना भाजपात घेण्यास चंद्रकांतदादा पाटील आग्रही होते. परंतु प्रतिक पाटील यांनी भाजपात जाणार नाही अशी भूमिका घेतल्याने चंद्रकांत पाटलांना अपयश आले. वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी स्वाभिमानीतर्फे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘गुरूंनी जशी निवडणुकीतून माघार घेतली आहे तशीच संधी शिष्याला अजूनही आहे’, असा सल्ला त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना दिला. माढ्यात दोन्ही पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे त्यामुळे संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील लढत चुरशीची होणार आहे.