fbpx

काही मराठा संघटनांना आर्थिक रसद पुरविणाऱ्या नेत्यांवर सरकारचा ‘वॉच’ : चंद्रकांत पाटील

मुंबई – मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने सर्व ती सकारात्मक पावले उचलली आहेत. मराठा समाज सरकारच्या कामांवर समाधानी देखील आहे. मात्र काही नेते आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांनी काही संघटनांना पुढे केले आहे. त्यांना आर्थिक रसद पुरविली आहे. गुप्तचर विभागाने याची संपूर्ण माहिती सरकारला दिली असून या सवांर्वर सरकारचा “वॉच’ आहे, असा इशारा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.पाटील यांच्या या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

मराठा समाजाच्या काही संघटनांनी गुरुवारी मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर मराठा समाजाच्या मागण्यांना सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा आरोप करीत यापुढील मोर्चे आता मूक असणार नाहीत. जे काही होईल त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर असणार आहे, असा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आयोजित पत्रकारपरिषदेत चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाबाबत सरकारने कोणती पावले उचलली आहेत, याची माहिती दिली.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
मराठा समाज सरकारच्या कामांवर समाधानी आहे.येते वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असणार आहे. यामुळे काही नेते समाजातील काही संघटनांना हाताशी धरून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या संघटना मोठ्या सभागृहात पत्रकार परिषदा घेतात. सरकारने जारी केलेले शासन निर्णय फाडतात. या सगळ्यांसाठी कोण आर्थिक रसद पुरवित आहे याची गुप्तचर विभागाने सगळी माहिती काढलेली आहे. सरकारचे या सर्व नेत्यांवर बारीक लक्ष आहे.उलट या नेत्यांनी समाजासाठी सरकारने राबविलेल्या विविध योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत आहेत की नाही याकडे लक्ष द्यावे. कुठे तसे होत नसेल तर सरकारच्या तातडीने निदर्शनास आणावे. सरकार हस्तक्षेप करून संबंधिताला न्याय मिळवून देईल.

2 Comments

Click here to post a comment