fbpx

बारामती पूर्ण अडचणीत… तर पवारांना दिल्लीत घर शोधाव लागेल – चंद्रकांत पाटील

पंढरपूर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु आहे, प्रत्येक पक्षाकडून आपण किती भारी आहोत हे सांगताना विरोधकांवर टीका केली जात आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका करणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात, आता या जागा भाजपने जिंकल्यावर त्यांना दिल्लीत राहण्यासाठी घर शोधाव लागेल, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

माढा लोकसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला येथे आयोजित कार्यकर्त्यां बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी माढा मतदारसंघात पराभव होणार हे दिसल्याने पवारांनी येथून माघार घेतल्याचा टोला पाटील यांनी लगावला आहे. या निवडणुकीत बारामती लोकसभेची जागा देखील धोक्यात असल्याची टीका त्यांनी केली.

शरद पवार हे चार खासदार घेवून ते दिल्लीमध्ये जातात, त्यांच्या जीवावर सर्वांशी सौदेबाजी केली जाते. त्यामुळे आता ह्या जागाच नाही राहिल्या तर दिल्लीत राहणार कुठे हा प्रश्न पडेल. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला उद्धवस्त करुन शरद पवार यांचे राजकारणच संपवण्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.