कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने; चंद्रकांत पाटलांची खंत

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने; चंद्रकांत पाटलांची खंत

Chandrakant patil

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून ज्या तीन कृषी कायद्यांमुळे (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते ते तीन कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मागे घेतल्याची घोषणा केली आहे. दीड वर्षापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला अखेर यश आले आहे. आज सकाळी देशाला संबोधित करत पंतप्रधान मोदींनी हे कायदे मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्याची घोषणा केल्यानंतर या कायद्यांना प्रचंड विरोध झाला. शेतकरी संघटनांनी हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लेच्या सीमेवर ठिया मांडला होता. केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या नाही तर फक्त मूठभर मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. या कायद्यांमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे.

शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ते इचलकरंजी येथे पत्रकारांशी बोलत होते.

शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्याला असे वाटते की, तीन कृषी कायद्यांमुळे शेतीमालाला चांगला भाव मिळणार होता आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख येणार होते. पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेश या राज्यातील प्रत्येकी छोट्या भागातील शेतकऱ्यांच्या गटांनी या कायद्यांना विरोध केला तरी बाकी संपूर्ण देशात शेतकरी आणि त्यांच्या संघटनांना हे कायदे मान्य होते. एका छोट्या समुहाला कायद्यांचे महत्त्व पटवून देण्यात अपयश आले. एक विशिष्ट गट संपूर्ण देशभर या विषयावरून अस्वस्थता निर्माण करत होता. सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही या शेतकऱ्यांचे आंदोलन चालू राहिले. अखेरीस कायदे मागे घेण्याचा निर्णय झाला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे कसे आहेत, हे पुन्हा एकदा समजाऊन सांगून ते अंमलात आणावेत, अशी विनंती चंद्रकात पाटलांनी यावेळी केली आहे.

कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीसोबतच बाहेर हवे तेथे माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार होते. त्यामुळे स्पर्धा वाढून त्याला चांगला भाव मिळणार असताना त्याला विरोध करण्यासारखे काहीही नव्हते. कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो व अशी शेती राज्यात अनेक ठिकाणी यापूर्वीच राबविली जात आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या