fbpx

मुख्यमंत्री असावा तर असा, बलात्कार पीडित मुलीला घेतले चंद्राबाबूंनी दत्तक

टीम महाराष्ट्र देशा- आपल्याकडे बलात्कार पीडीतेविषयी सहानभूती बऱ्याच जणांना असते मात्र काही मदत करण्याची वेळ की हात आखडता घेतला जातो. मात्र आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला दत्तक घेत सर्वांसमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे. मदत करण्याचं फक्त आश्वासन न देता एक पाऊल पुढे टाकत नायडूंनी हे कौतुकास्पद काम केलं आहे.

आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातील दाचेपल्ली गावात राहणाऱ्या या ९ वर्षीय मुलीवर एका ५० वर्षीय रिक्षा चालकाने बलात्कार केला होता. त्यानंतर बलात्कार करणाऱ्या नराधमाने देखील गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर संपूर्ण आंध्र प्रदेश हादरले होते व त्यानंतर राज्य सरकारने पीडित मुलीला ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली होती. तसेच तिच्या वडिलांना २ एकर जमीन व सरकारी नोकरी देण्याचे देखील आश्वासन दिले होते.

या वेळी बोलताना अशा प्रकारच्या गुन्ह्यांना येथे थारा नाही. जो कोणी असे गुन्हे करेल, तो दिवस त्याच्या आयुष्याचा अखेरचा दिवस असेल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या नऊ वर्षांच्या मुलीची भेट नायडू आज सरकारी दवाखान्यात घेतली. असे गुन्हे करणाऱ्यांवर निर्भया’ व पॉक्सो’ कायद्याखाली गुन्हा नोंदविला जाईल. त्यांच्याबद्दल कडक धोरण राबविले जाईल. त्यांना फासावर लटकवण्यात येईल, ‘ असे सांगत यातून इतरांना कडक इशारा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बारा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद नवीन कायद्यात केल्याने त्याचे स्वागत नायडू यांनी केले. हे गुन्हे कडक पद्धतीने हाताळले पाहिजेत. असे गुन्हेगार रस्त्यात दिसल्यास महिलांनी त्यांच्या तोंडावर थुंकावे. लोकांमध्ये या गुन्ह्याविरोधात आवाज उठवायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शनिवारी नायडू यांनी त्या मुलीची गुंटूर जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी त्या मुलीला दत्तक घेतल्याची घोषणा करत तिचा शिक्षणाचा सर्व खर्च करणार असल्याची घोषणा केली. तसेच त्यांनी गुंटूर जिल्हाधिकाऱ्यांना मुलीचे चांगल्या शाळेत अॅडमिशन करण्याचे आदेश दिले आहेत.नायडू यांच्या या निर्णयामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.