कुलगुरूंचा अनागोंदी कारभार; स्वतःच्या निवासस्थानावर लाखो रूपयांची उधळण

aurangabad uni

औरंगाबाद: विद्यापीठात शासकीय कामकाज विद्यापीठ कायद्यानुसार होत नसल्याच्या अनेक तक्रारी राज्यपाल तथा कुलपती यांच्याकडे विविध संघटना, संस्था आणि व्यक्तींनी केल्या होत्या. याचवेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण यांच्या शिष्टमंडळानेही राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेत कुलगुरूंनी केलेल्या अनियमिततेविषीयी निवेदन दिले होते. त्यामुळे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कामकाजासंदर्भात चौकशी करण्यासाठीचे आदेश दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहामध्ये विद्यार्थांसाठी काहीच सोयीसुविधा नाहीत मुलींच्या वसतिगृहात पाण्याच्या अडचणी आहेत. एकीकडे कुलगुरू व अधिष्ठाच्या सोयीसुविधासाठी लाखो रुपएयांची उधळपट्टी केली जाते. तसेच वसतिगृहाची डागडुजी न करता स्वतःच्या निवासस्थानावर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत.

कुलगुरूच्या निवासस्थानाचे नेहमी काहीना काही बांधकाम चालू असते. सध्या त्यांच्या निवासस्थानाची संरक्षणभिंतीची उंची वाढवण्यात येत आहे. त्यावर १६ लाख ३९ हजार रुपये खर्च आला आहे तसेच बंगल्यात १५ लाख रूपयांची सर्व सोयीयुक्त अद्यावत व्यायामशाळा सुरू केली आहे. अशा अनागोंदी कारभाराची चौकशी केली जाणार आहे त्यामुळे कुलगुरू चांगलेच अडचणीत येणार आहेत.