रामपाल महाराजांच्या अनुयायांचे आखाडा परिषदेला चर्चेचे आव्हान

नाशिक : आखाडा परिषदेने चौदा संतांना भोंदू जाहीर केल्याने रामपाल महाराज यांच्या अनुयायांनी आखाडा परिषदेला शास्त्रानुसार आध्यात्मिक ज्ञान चर्चेचे जाहीर आव्हान नाशिक येथील अनुयायांनी दिले आहे. आखाडा परिषदेला संतांना भोंदू जाहीर करण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही भारतीय लोकशाही निरपेक्ष आहे. आपल्या देशात फक्त न्यायालयालाच हा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे. खरोखरच रामपाल दोषी असल्यास त्यांना न्यायालय शिक्षा देऊ शकतात, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रामपाल यांच्या नाशिकमधील अनुयायांनी म्हटले आहे .

रामपाल महाराज हेच या पृथ्वीतलावर एकमेव संत गुरू आहेत. त्यांनी अनिष्ट चालीरीती व परंपरेचे खंडन करून सर्व पवित्र धर्मांचा सखोल अभ्यास करून सत्य अध्यात्मिक तत्त्वज्ञान संपूर्ण जगासमोर मांडले आहे . या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची जाहीर चर्चा संत रामपाल महाराज यांच्याबरोबर करावी आणि सत्य तत्त्वज्ञान शास्त्रानुसार काय आहे याचे गूढ ज्ञान जगासमोर मांडावे .ज्यांच्याकडे धर्मशास्त्रानुसार अध्यात्मिक सत्य ज्ञान आहे त्यांनी जाहीर आध्यात्मिक चर्चा करावी आणि जे या अध्यात्मिक चर्चेला येणार नाहीत किंवा चर्चेत सहभागी होणार नाहीत त्यांनी आपली हार स्वीकारलेली आहे ,असे गृहीत धरण्यात येईल. जाहीर केलेल्या यादीमधून संत रामपाल महाराजांचे नाव काढून टाकावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल,असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

प्रसिद्धी पत्रकावर महाराष्ट्र स्टेट को ऑर्डिनेटर राजूदास व संभाग्य को ऑर्डिनेटर मधुकरदास भगवानदास,लक्ष्मीनारायणदास,मोहनदास, सूरजदास, सनीदास, उत्तमदास , ठाकूरदास आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .