वंचितांच्या चेहऱ्यावरील हास्य आनंददायी : अरुणा ओसवाल

द्वारका जालान लिखित 'चलती रहे जिंदगी' पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : “आपल्या आजूबाजूला अनेक गरजू, वंचित घटक आहेत. ज्यांना अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गोष्टीही मिळत नाहीत. अशा वंचितांना आपल्यातील थोडासा भाग जरी दिला, तरी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलते. त्यांच्या चेहऱ्यावरील हे हास्य आपल्या आयुष्यात आनंद देणारे आहे. आपल्याप्रमाणेच त्यांनाही जगण्याचा आनंद देण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे,” असे प्रतिपादन लायन्स क्लबच्या आंतरराष्ट्रीय संचालक अरुणा ओसवाल यांनी केले.
लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३ डी २ च्या वतीने आयोजित सोहळ्यात प्रसिद्ध निवेदक, लेखक आणि उद्योजक द्वारका जालान यांनी लिहिलेल्या ‘चलती रहे जिंदगी’ या पुस्तकाचे प्रकाशन ओसवाल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रेमचंद बाफना, लायन्स क्लबचे प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, राजेंद्र भट, सुधा जालान, समीर जालान, जनसंपर्क अधिकारी शाम खंडेलवाल, अरुण सिंघल, अनिल देसाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाम खंडेलवाल यांना उत्कृष्ट लायन म्हणून गौरविण्यात आले.
अरुणा ओसवाल म्हणाल्या, “आपल्या एखाद्या छोट्या कृतीतूनही समाजात मोठा बदल घडू शकतो. गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलू शकतो. काही ठिकाणी लोक कॉफीशॉपमध्ये जास्तीची ऑर्डर देऊन गरिबांसाठी ती कॉफी किंवा खाद्यपदार्थ देतात. ते पदार्थ घेतल्यानंतर गरिबांच्या चेहऱ्यावरील आनंद मी पाहिला आहे. त्यामुळे आपल्या हातून शक्य तितकी मदत या गरजूंसाठी करणे हे आपले सामाजिक दायित्व आहे. पुण्यातून लायन्स क्लबचे काम अतिशय उत्कृष्टपणे सुरु आहे, याचाही आनंद वाटतो.”
द्वारका जालान म्हणाले, “गीत-संगीतातून आपल्या आयुष्याचा व्यापक उलगडा झालेला आहे. त्याच गीतांचा अर्थ सांगणारे हे पुस्तक आहे. याआधीही ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया’ आणि ‘आदमी मुसाफिर है’ अशी दोन पुस्तके जीवनाचा अर्थ सांगतात. आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंग या गीतांमधून कसे जोडलेले आहेत, हे या पुस्तकांमध्ये वर्णिले आहे.”