fbpx

उस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी; ‘निलंगेकर’ यांच्या मागणीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ

टीम महाराष्ट्र देशा – (प्रा.प्रदीप मुरमे) काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना आगामी निवडणूकीत उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याची मागणी करुन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे.

काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात उस्मानाबादची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक मातब्बर उमेदवार असून पक्षाकडून लवकरच येथील उमेदवारी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर निलंगा येथील काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंञी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे सुपूञ अशोकराव यांनी अचानकपणे ही भूमिका घेतल्याने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.अशोकराव पाटील यांनी १६ जानेवारी रोजी लातूर येथे पञकार परिषद घेवून हि मागणी केली आहे. केवळ ते मागणी करुन थांबले नाहीत तर चाकूरसाहेब काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेतृत्व असून त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे तब्बल ७ वेळा प्रतिनिधित्व केले आहे. चाकूरकर यांना उमेदवारी दिल्यास महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात आगामी निवडणूकीत काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होणार असल्यामुळे आपण उस्मानाबाद मतदारसंघातून चाकूरकर यांना उमेदवारी देण्याची मागणी हायकमांडकडे केली असल्याचे सांगितले.

अशोकराव पाटील निलंगेकर हे निलंगा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आगामी विधानसभा निवडणूकीचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी पक्षश्रेष्ठी दरबारी माजी मुख्यमंञी डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे राजकीय वजन पाहता अशोकराव पाटील निलंगेकर यांनाच उमेदवारी मिळणार असा दावा अशोकराव पाटील यांचे समर्थक करतात. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक बगदूरे यांना देखील आमदारकीचे वेध लागले असून मागील अनेक दिवसापासून ते जोरदारपणे कामाला लागले आहेत. मतदारसंघातील जनतेशी ते सातत्याने संपर्क साधण्यावर भर देत आहेत. परंतु निलंगा विधानसभा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला सुटला तर बगदूरे यांची मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत निलंगा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावा अशी बगदूरे यांनी पक्षाकडे मागणी लावून धरली आहे. एवढेच नव्हे तर थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बारामती येथे शिष्टमंडळासह भेट घेवून हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या या मागणीने अशोकराव समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

दरम्यान नुकतच अशोकराव यांनी पञकार परिषद घेवून जेष्ठ नेते शिवराज पाटील यांना उस्मानाबाद लोकसभेची मागणी करुन एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. आमदार होण्याचे स्वप्न पाहणारे अशोकराव पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. ब-याच दिवसापासून राजकीय प्रसिध्दीच्या झोतात नसलेले अशोकराव यांनी चाकूरकर यांच्या उमेदवारीची मागणी करुन लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकीय पटलावर प्रकाशझोतात आले आहेत.

सहसा पञकार मिञांपासून दूर राहण्यात स्वतःला धन्य समजणारे अशोकराव आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जवळीक करु इच्छितात.त्याचबरोबर उस्मानाबाद मतदारसंघच काँग्रेसला सोडण्यात यावा अशी मागणी करुन निलंगा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावा या बगदूरे यांच्या मागणीवर अशोकराव यांनी कुरघोडी केली आहे.एकुणच या पञकार परिषदेच्या माध्यमातून अशोकराव पाटील यांनी आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एका दगडात अनेक पक्षी मारले म्हंटले तर काही वावगे ठरणार नाही ,हे माञ निश्चित.