‘दरेकरांच्या विरोधात चाकणकरांनी केलेली तक्रार म्हणजे प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न’

रुपाली चाकणकर

पुणे : भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी शिरुर येथील सभेत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आक्रमक होत दरेकर यांनी महिलांची माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यावर मी कुणाच्या वक्तव्याला फारसे महत्व देत नाही, अतिरेकी भाषा करु नये, असे उत्तर देरेकरांनी दिले होते. याप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी दरेकरांविरोधात पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, एका बाजूला हा वाद सुरु असताना आता या प्रकरणावर अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष, माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही काही स्त्री नाही, तर या पार्टीच्या रंगलेल्या गालाचा मुका घेणे याचा अर्थ स्त्रीच्या गालाचा मुका घेणे होत नाही. म्हणून चोराच्या मनात चांदणे असे तुम्हाला का वाटले?

भारतीय जनता पार्टी ही एक संस्कृती नुसार वागणारी संस्कारित पार्टी आहे भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते हे महिलांचा सन्मान करणारे आहेत हे समाजाला माहित आहे. अशा अवस्थेत आमचे नेते माननीय विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर साहेब हे महिलांचा कसा अपमान करू शकतात हा प्रश्न आपल्याला बोचणारा नाही का? राजकारणासाठी राजकीय फायदा घेण्याचा तुम्ही केलेला प्रयत्न तुमच्या केलेल्या तक्रारीवरून लक्षात येत आहे. महिलांच्या सन्माना पेक्षा तुम्हाला राजकारण महत्त्वाचे आहे. तुम्ही पोलिसात जी तक्रार केलेली आहे ती वस्तुस्थिती नसून तुमच्या राजकीय जीवना मध्ये न बोललेल्या शब्दांचा विपर्यास करून राजकीय फायदा करून घेण्यासाठी व प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी केलेली धडपड व केविलवाणा प्रयत्नच ….. अशा प्रयत्नांना समाजातील महिला माफ करणार नाहीत असं त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या