मनसेने घेतलेल्या भुमिकेमुळे राष्ट्रवादीला फायदा होणार – भुजबळ

blank

टीम महाराष्ट्र देशा :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा झाल्यापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. तसेच, सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. तर तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात कामाला लागा, असा आदेश दिला आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची आयती फौज प्रचाराला मिळाल्याने आघाडीचा आनंद गगनात मावेना असं झालं आहे.

२०१४ मध्ये राज ठाकरे हे मोदींचे तोंडभरून कौतुक करत होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी आपली भूमिका अचानक बदलली आहे. आता व्यंगचित्र तसेच आपल्या भाषणांमधून मोदी सरकारवर टीका करताना पहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणूक मनसे लढवत नसली तरीही या प्रचारादरम्यान भाजप नेत्यांकडून लक्ष्य केले जात आहे.

राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष मोदींविरोधात प्रचार करणार असल्याने आमचा फायदा होणार आहे. त्यांच्या या धोरणामुळे आमचा म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा फायदा होणार आहे असं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्धापन दिनानंतर घेतलेल्या सभेत मनसेची भूमिका स्पष्ट केली होती. राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आमच्या फायद्याची आहे असं आता भुजबळ यांनी म्हटलं आहे.