आम्ही तुरुंगात असतांना कार्यकर्त्यांना दुःख होतं, त्यांना खाली पाहावं लागलं, याचं दुःख होतं – भुजबळ

chagan bhujbal

नाशिक – लोकशाही आहे, त्यांनी खुशाल हायकोर्टात जावं. आम्ही अधिक उजळ माथ्याने समोर येऊ असे  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सदन प्रकरण शेवटच्या टप्प्यात आलेलं असतांना निवडणुकांमुळे शिळ्या कढीला ऊत आणला गेला. नाशिकला आले काय किंवा कुठेही गेले काय, काय झालं ? माध्यमांमध्ये किती महत्व मिळालं ? असा सवाल त्यांनी उपस्थित करत ‘मेरे खिलाफ होनेवाली बातो को मै अक्सर खामोशी से सूनता हुं, जबाब देने का हक मैने वक्त को दे रखा है’ अशा शब्दात त्यांनी यावेळी विरोधकांवर टीका केली.

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ व इतरांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर आज मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर आले असतांना नाशिक येथील भुजबळ फार्म येथील कार्यालयात फटाके, ढोल ताशा वाजवत, पेढे वाटून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, आमच्यावर सर्वांचं प्रेम आहे. आज शुभदिनी नाशकात आलोय. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांना आनंद होणारचं आहे. आमच्यावर कारवाई सुरु असतांना गेल्या ५ वर्षांपासून कार्यकर्त्यांचं मन जळत होतं. आम्ही तुरुंगात असतांना कार्यकर्त्यांना दुःख होतं, कार्यकर्त्यांना खाली पाहावं लागेल, याचं दुःख होतं. तुरुंगात असतांना भुजबळांना तुरुंगातून सोडा, या मागणीसाठी हजारो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला असल्याचे सांगत असंख्य लोकांचे आशीर्वाद आपल्यासोबत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

ते म्हणाले की, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विधानसभा लढलो. विचारांच्या माध्यमातून लढाई लढलो, निवडणुकांच्या वेळी थोडं जास्त बोललं जातं. त्यातून काही जण दुखावले जातात. त्यानंतर सत्तेचा दुरुपयोग केला जातो. आज जसे हार पडतायत, तसे प्रहारही पडलेत. राजकारणात प्रहार सहन करण्याची तयारी ठेवावी लागते. सध्या राजकारणातील लोकांची सहनशक्ती कमी होत चाललीय. मात्र आता लोक हुशार झाली आहे. जास्त काळ आपण लोकांना मूर्ख बनवू शकत नाही, हे सिद्ध झालंय अशी टीका त्यांनी यावेळी केली.

ते म्हणाले की, केंद्र सरकारचा कारभार तर अवर्णनीय आहे. तुम्ही सरळ वागलात की तुमचा भुजबळ करू हा वाक्प्रचार झाला होता, आता तो बदलावा लागेल. माध्यमांमुळे आजकाल सर्वांना लगेचचं सर्व कळतय. जनता सब जानती है. असे सांगत केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली. तसेच नाशिक- मराठवाडा पाणी वाटपाबाबत बोलतांना ते म्हणाले की, गोदावरी खोऱ्यातील पाण्याचं समन्यायी वाटप आहे. ते त्यानुसार होईल. नाशिक तसेच मराठवाडा कुणावरही अन्याय होणार नाही. त्याचबरोबर नाशिकची जलसंपदाची कार्यालयं नाशिकहून कुठेही हलवली जाणार नाहीत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या