fbpx

ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका : छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

chagan bhujbal latest pic

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई हायकोर्टात ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसींची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची नेमणूक करा, अशी मागणी भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ओबीसी आरक्षणाबाबत पुनर्विचार करा अशी मागणी करणारी याचिका मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.

‘ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी, मुकुल रोहतगी, अभिषेक मनु सिंघवी, अॅस्पि चिनॉय किंवा गोपालकृष्ण सुब्रमण्यम यासारख्या ख्यातनाम आणि ज्येष्ठ विधीज्ञांची नेमणूक करावी अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. न्यायालयात ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तर राज्यात मोठा उद्रेक निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल”, असा इशारा देखील भुजबळ यांनी दिला आहे.

दरम्यान,यापूर्वी ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण अभ्यास न करता दिल्याने ते रद्द करण्याची मागणी याचिकेतून मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंनी केली आहे.कोणतेही आरक्षण देताना त्यापूर्वी सर्वेक्षण करण्याची गरज असते, या बाळासाहेब सराटे यांच्या म्हणण्यात काही प्रमाणात तथ्य आहे, असे सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली आहे.20 डिसेंबर 2018 रोजी मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत, ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण अभ्यास न करता दिल्याने ते रद्द करण्याची मागणी याचिकेतून केली होती.