fbpx

बुरखा घालणाऱ्या सर्वच महिला दहशतवादी नसतात, रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंच्या मागणीला विरोध

udhav -ramdas aathavale

टीम महाराष्ट्र देशा: श्रीलंकेमध्ये घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस दाखवत देशात बुरखा आणि नकाबवर बंदी घातली आहे. हाच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतात देखील बुरखा बंदी करण्याची मागणी केली आहे. ठाकरे यांच्या मागणीला आता एनडीएमधूनच विरोध होताना दिसत आहे.

बुरखा घालणे हि एक परंपरा असून हा त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे देशात बुरखा बंदी घालता येणार नाही. बुरखा घालणाऱ्या सर्वच महिला दहशतवादी नसतात, असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंच्या मागणीला विरोध केला आहे. तसेच ज्या महिला दहशतवादी आहेत, त्यांचा बुरखा काढण्यात यावा असंही आठवले म्हणाले आहेत.

रावणाच्या लंकेत बुरखा बंदी, मग रामाच्या अयोध्येत कधी ?, उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल

श्रीलंकेमध्ये घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो सामान्य नागरिकांचे प्राण गेले आहेत, बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस दाखवत देशात बुरखा आणि नकाबवर बंदी घातली आहे. हाच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतात देखील बुरखा बंदी करण्याची मागणी केली आहे. ‘सामना’ अग्रलेखातून राष्ट्रहितासाठी ही मागणी करत असल्याचं म्हंटले आहे.

फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहरा झाकणाऱ्या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न असल्याचं अग्रलेखात सांगण्यात आलं आहे.

श्रीलंकेत भीषण बॉम्बस्फोट झाले असले तरी हिंदुस्थानला त्याचे हादरे बसले आहेत. शेजारधर्म तर आहेच, पण लंकेशी आपले धार्मिक आणि भावनिक संबंधदेखील आहेत. सरकारी आकडा काहीही असला तरी कोलंबोतील बॉम्बस्फोट मालिकेत पाचशेहून जास्त निरपराध्यांचा बळी गेला आहे. लिट्टेच्या दहशतवादातून मुक्त झालेला हा देश आता इस्लामी दहशतवादाचा बळी ठरला. हिंदुस्थान, विशेषतः हिंदुस्थानचा जम्मू आणि कश्मीर प्रांत त्याच इस्लामी दहशतवादाने त्रस्त आणि जर्जर झाला आहे. प्रश्न इतकाच आहे की, श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे जी कठोर पावले उचलतात तशी पावले आपण कधी उचलणार?, असा सवाल सामनामधून विचारण्यात आला आहे.