शरद पवार मतांचे सौदागर – गिरीराज सिंग

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी काल औरंगाबादमधील सभेत तलाकच्या प्रक्रियेतील सरकारच्या हस्तक्षेपाला पाठींबा देणार नसल्याच सांगितले होते. याबदल केंद्रीयमंत्री गिरीराज सिंग यांना विचारला असता ‘२२ मुस्लीम देशांमध्ये तलाक संपुष्टात आला आहे. मात्र भारतामध्ये असणारे मतांचे सौदागर तलाकच्या प्रक्रियेत सगळ्यात मोठा अडथळा असल्याच म्हणत सिंग यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकसभेमध्ये कॉंग्रेस आणि इतर पक्षांनी दिलेल्या पाठींब्याप्रमाणे त्यांनी राज्यसभेतही सरकारच्या निर्णयाला पाठींबा द्यावा अन्यथा त्यांची दुतोंडी भूमिका जगासमोर येईल अशी टीकाही गिरीराज सिंग यांनी केली.

नेमक काय म्हणाले होते शरद पवार

उत्तर प्रदेशमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी मुस्लिम समाजाने प्रभात फेरी काढली. त्यावर भाजपच्या विचाराच्या लोकांनी हल्ला केला. त्यातून शांत असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये दंगली उसळल्या. ट्रिपल तलाकच्या मुद्यावर मुस्लिम भगिनींना संरक्षण द्यायचा विचार असेल तर मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंना विश्वासात घेऊन पाउलं टाकता येतील. तलाक या कुराणाने इस्लामच्या माध्यमातून दिलेल्या मार्गात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुठल्याही राज्यकर्त्याकडे नाही. तुम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप करता याचा अर्थ एका धर्माच्या लोकांना समाजामध्ये एका वेगळ्या स्थितीला नेऊन पोहचवण्याचं काम तुम्ही करताय. त्याला आम्ही कदापि पाठिंबा देणार नाही.