‘फक्त मराठा आरक्षणच नाही तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतही केंद्राने प्रयत्न करावा’

modi vs chavhan

मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे या भेटीसाठी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मराठा आरक्षणासह सर्वच विषय गांभीर्याने ऐकले असून ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. या भेटीवर अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, आता या भेटीत उपस्थित असणारे अशोक चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही वैयक्तिक भेट झाल्याची माहिती समोर आली. दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली. याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना विचारण्यात आलं असता त्यांनीही दोन्ही नेत्यांमध्ये वैयक्तिक भेट झाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला. पण या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचं ते म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत माहिती देताना अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांकडे आवश्यक घटनादुरूस्ती करुन सकारात्मक पावलं उचलावीत अशी विनंती केल्याचं सांगितलं. फक्त मराठा आरक्षणच नाही तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतही केंद्राने प्रयत्न करावा अशी मागणी करण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या