fbpx

जुळ्या बालमुनींच्या शतावधानाने श्रोते अचंबित

पुणे : जैन धर्माच्या सागर समुदायातील अवघ्या दहा वर्षांच्या नमिचंद्रसागर व नेमिचंद्रसागर या जुळ्या बालमुनींनी केलेल्या शतावधान प्रयोगाने श्रोते अचंबित झाले. हे दोघे भाऊ आचार्य नयनचंद्रसागर यांचे शिष्य युवाशतावधानी अभिनंदनचंद्रसागर यांचे शिष्य आहेत. श्री नाकोडा पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने बंगळूर येथे नुकतेच या बालशतावधान प्रयोगाचे आयोजन केले होते.

संस्कृत, प्राकृत, कन्नड, उर्दू, मारवाडी, हिंदी, गुजराती, पंजाबी, मराठी व इंग्रजी या 10 भाषांमध्ये दोघांनीही प्रवचन करीत सुवर्णाक्षरांत इतिहास लिहिला. राज्यपाल वजूभाई वाला, शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंग चुडासमा, All India Anti Terrorist Front चे  अध्यक्ष मनिंदरसिंग बिट्टा यांच्यासह हिंदू, मुस्लीम, शीख धर्मातील धर्मगुरुंसह हजारोंच्या संख्येने श्रोते उपस्थित होते. सर्वच उपस्थितांना या दोन्ही भावांनी आश्चर्यचकित केले.

बालशतावधानी व बहुविधभाषाभाषी या सोन्याच्या अक्षरांनी लिहिलेल्या पदवीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते दोघांना प्रदान करण्यात आले. भूपेंद्रसिंग चुडासमा यांच्या प्रश्नाने बालशतावधाची सुरुवात झाली. त्यानंतर एकापाठोपाठ 100 प्रश्नांची विचारणा झाली. सरळ आणि उलट्या क्रमाने प्रश्न विचारले गेले. त्यांच्या अफलातून उत्तरांनी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. गणित, अंकगणित आणि इतर अनेक प्रश्नांच्या अचूक उत्तरांनी श्रोते भारावून गेले.