fbpx

शिवराज्याभिषेक दिन : महाराजांच्या जयघोषाने रायगड दुमदुमला

टीम महाराष्ट्र देशा-  रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने हा सोहळा साजरा करण्यात येत आहे. शिवराज्याभिषेक सोहळयासाठी राज्यभरातून शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. बुधवार संध्याकाळपासूनच रायगडावर वेगवेगळया कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन झाले. त्यानंतर शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. राज्यातील युद्धकला आखाड्यांचा यात सहभाग होता. तलवार, भाला, जांबिया, माडू, फरी- गदगा यांचे सादरीकरण झाले. या वेळी इतिहास अभ्यासक राम यादव यांच्या दुर्गराज रायगड परिचित-अपरिचित स्थळांचे छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात १२ बलुतेदार आणि १८आलुतेदार अशा सर्व जाती-धर्मीयांचा सहभाग असणार आहे. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता, मंगळवार पेठेतील मराठा महासंघाच्या कार्यालयापासून मिरवणुकीची सुरुवात होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि महापौर सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार आहे. यावेळी खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. सतेज पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी सहभागी असणार आहेत.