पवित्र रमजानचा सण साध्या पध्दतीने साजरा करा! अब्दुल सत्तार यांचे मुस्लिम बांधवांना आवाहन

सिल्लोड : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान अर्थात ईद- ऊल- फित्रचा सण लवकरच साजरा होत आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता रमजानचा सण मुस्लिम बांधवांनी साध्या पध्दतीने आणि घरगुती वातावरणात साजरा करावा, असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.

रमजानचा सण शेवटच्या टप्प्यात आहे. संपूर्ण महिनाभर ठेवलेले रोजे रमजान ईदच्या दिवशी सोडले जातात. आपल्या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह सर्वजण प्रयत्नशील आहेत. कोरोना विषाणूच्या संकटामुळे यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. त्यास मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सणही यास अपवाद नाही. यापूर्वीही मुस्लिम बांधवांनी रमजान ईदसह विविध सण साधेपणाने आणि घरगुती वातावरणात साजरे करून जिल्हा प्रशासनास सहकार्य केलेले आहे.

पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव सार्वजनिकरीत्या नमाज अदा करतात. या कालावधीत नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाच्या आदेशानुसार रमजानचा सण साध्या पध्दतीने आणि घरगुती पध्दतीने साजरा करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह, इफ्तारसाठी मशीद, ईदगाह, सार्वजनिक मोकळ्या ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरा करावा. असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी एका वेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत पवित्र रमजान महिन्याचा सण साधेपणाने साजरा करावा. बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी करू नये. जिल्हा प्रशासनाने साहित्य खरेदीसाठी घालून दिलेल्या वेळेचे बंधन पाळावे. विनाकारण गर्दी करू नये किंवा रस्त्यावर फिरू नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ऑनलाइन पध्दतीने करावे, असेही आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या