शरद कळसकरला 15 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी

पुणे- नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांना न्यायालयीन कोठडी, तर शरद कळसकरला 15 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी आज पुणे न्यायालयाने सुनावली.

पुणे न्यायालयात दाभोलकर हत्या प्रकरणी न्यायाधीश एस.ए.सय्यद यांच्यासमोर सुनावणी झाली. सीबीआयचे वकील विनयकुमार ढाकणे आणि आरोपीचे वकील धर्मराज यांनी काम पाहिले. कोठडीची मुदत संपत असल्याने राजेश बंगेरा अमित दिगवेकर आणि शरद कळसकर यांना सीबीआयने सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. यांनी बंगेरा आणि दिगवेकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर शरद कळसकर याच्या कोठडीत १५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

शरद कळसकर, अमोल काळे, वीरेंद्र तावडे यांच्याकडून नेमके काय सांगण्यात आले होते याचा तपास करायचा आहे. शस्त्राचं प्रशिक्षण कोठे घेतले, पैसा कोणी पुरवला, याचीही चौकशी करायची आहे. त्यासाठी कोठडीची आवश्यकता असून अमोल काळे याची कोठडी 14 तारखेला संपत आहे. या सगळ्यांकडे एकत्र तपास करायचा आहे. या सर्वांना हत्या ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.

दरम्यान,सीबीआयच्या कोठडीत असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी राजेश बंगेरा याने सीबीआयच्या कोठडीत असताना कोल्हापूर एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी मारहाण केल्याचा आरोप न्यायालयात केला़. या प्रकरणात १० दिवसांच्या कोठडीत तपासात प्रगती झाली नसल्याचे म्हणत न्यायालयाने सीबीआयला फटकारले आहे.