मंगळसूत्र चोरास वाहतूक पोलिसाने पकडले

सोलापूर – सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोरास वाहतूक शाखेचे पोलीस भागवत शिंदे यांनी समय सुचकता दाखवत रस्त्यावर पकडले. शांता सिद्राम बडदे (रा. देशमुख पाटील वस्ती) या प्रभात टॉकिज समोरून जात होत्या. तेवढ्यात शिवाजी माने (वय २३, रा. न्यु बुधवार पेठ) याने त्यांचे मंगळसूत्र हिसकावून सरस्वती चौकाकडे पळ काढला. त्यांनी आरडाओरडा करुन त्याच्या मागे धावू लागल्या. सरस्वती चौकात वाहतूक नियोजनासाठी कामावर असलेले शिंदे यांनी समय सुचकता दाखवत पळत जाऊन त्याला पकडले.

शिंदे यांनी फोन करून कमांडो पथकास बोलावून घेतले. दोघा पोलिसांनी त्यासस ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. त्याच्याकडील मंगळसूत्र घेऊन महिलेला परत देण्यात आले. माने याच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.