हिंस्त्र पशुंनी पाडला गायीच्या पिलांचा फडशा

नागरिकांमध्ये प्रचंड भीती

औरंगाबाद: शेती आखाड्यावर असलेल्या पाळीव जनावरांवर हिंस्त्र पशूंच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ होत असून पिंपळगाव, देऊळगाव या नदीकाठच्या गावानंतर परिसरातीलच देवठाणा येथे ५ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास शेतातील गायीच्या बछड्यांवर एक हिंस्त्र पशूने प्राणघातक हल्ला करून शरीराचा अर्धा भाग खाऊन टाकल्याची घटना घडली. या घटनेमुळे नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपळगाव बाळापूर येथे १ मार्च रोजी शेळीच्या दोन, देऊळगाव दुधाटे येथे हिंस्त्र पशु चे वस्त्याव्य, तर सोमवारी रात्री देवठाणा येथील पिराजी व्यंकटी जोगदंड यांच्या शेतातील गायीच्या पिलावर प्राणघातक हल्ला केला. या हिंस्त्र पशूने त्या पिलांच्या शरीराच्या मागील बाजूचा अर्धा भाग खाऊन टाकला. आठवड्यातील सततच्या तीन घटनांमुळे नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तिन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर परभणी वन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे केले. पिंपळगाव व देऊळगाव येथे वाढलेल्या पायाचे ठसे पशूच्या केसांचा पंचनामा केल्यानंतर तो हिंस्त्र पशू वाघ किंवा बिबट्या नसून तरस असल्याचा निर्वाळा वन विभागाने दिला आहे. देवठाणा येथेही ६ मार्च रोजी वनपाल चंद्रा मोघे व पथकाने सकाळी भेट दिली. त्या ठिकाणचे पुरावे जमा करून नेमका हा हिंस्त्र पशू कोण याबाबत अंदाज वर्तवला जाऊ शकतो.

देवठाणा येथे सोमवारी रात्री त्या पशुशी शेती आखाड्यांवरील कुत्र्यांनी झुंज दिली असल्याचे दुसऱ्या आखाड्यांवरील नागरिकांचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी आखाड्यांवरील पाळीव प्राण्यावर असाच हल्ला झाला होता. त्यावेळी वन विभागाकडून त्या प्राण्यास पकडण्यासाठी पिंजरा बसवण्यात आला होता .पंधरा दिवसाच्या प्रयत्नांनंतर सुध्दा तो सापडू शकला नाही.
हिंस्त्र पशुच्या नागरी वस्तीकडील वास्तव्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे पशु लहान प्राण्यावर हल्ला करू शकतात असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. हल्ला करणारा पशू तरस असल्याचे वन विभागाकडून वारंवार सांगण्यात येते असले तरी या पशूंची या परिसरात संख्या किती आहे हे स्पष्ट झाले नाही. नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेती आखाड्यावर राहू नये अथवा सुरक्षिततेसाठी शेकोटी व काठ्यांचा वापर करावा, अशी सूचना वन विभागाने केली आहे.

You might also like
Comments
Loading...