fbpx

जातीवादी राजकारण आणि हरवलेला माणूस

padmavat roit

संदीप कापडे

लोकशाही असलेल्या भारतात अनेक धार्मिक संघटनेनी कायदा हाती घेण्याचा प्रयत्न केला. मग ते कोरेगाव -भीमा प्रकरण असो कि सध्या सुरु असेलेला पद्मावत वाद. मात्र सरकारच मौन बघता यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे का? सुप्रीम कोर्टापेक्षा संघटना मोठ्या आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दावोस येथील आर्थिक परिषदेत जागतिक समुदायापुढे लोकशाही वातावरण आणि प्रगतीपथावर असलेला देश म्हणून भारताविषयी सांगितले. मात्र आताची परिस्थिती नरेंद्र मोदींच्या मतांवर बोट उठवणारी आहे.

चित्रपटांना वाढता विरोध बघता स्वतःच वर्चस्व सिद्ध करण्यासाठी धार्मिक संघटना प्रयत्नात आहेत. माध्यम म्हणून ते कधी चित्रपटाचा उपयोग घेतात तर कधी जातीय भांडणाचा. भारतात वाढलेलं गढूळ जातीय राजकारण भारताची प्रतिमा मलीन करत आहे. एकीकडे पद्मावतला वाढता विरोध तर दुसरीकडे ‘दशक्रिया’ या मराठी चित्रपटाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने हा चित्रपट ब्राह्मण व हिंदू प्रथा परंपरांची बदनामी करणारा असल्याचा आरोप करून त्याच्या प्रदर्शनास विरोध केला होता. खरे तर अशा प्रकारच्या वादग्रस्त चित्रपटांना विरोध करणारे जितके दोषी आहेत तितकेच वादाला खतपाणी घालणारे चित्रपट निर्माते, दिग्दर्शकही तितकेच दोषी आहेत. सामाजिक भान न राखता समाजमनात आदराचे स्थान असलेल्या व्यक्तींवर केवळ पैसे कमविण्याच्या हेतूने चित्रपट काढायचे. व नंतर चित्रपटाला विरोध झाला की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली म्हणून गळा काढायचा. मात्र दुसरीकडे संघटनांनी कोणताही सारासार विचार न करता चित्रपटातून आपल्या आदर्श व्यक्तिमत्वांची बदनामी झाली म्हणून चित्रपटाला टोकाचा विरोध करायचा. हिंसक भाषा वापरायची. दगडफेक,तोडफोड करायची, बसेसला आग लावायची. हे कितपत योग्य आहे? आपला समाज सामाजिकदृष्ट्या अजूनही परिपक्व झाला नसल्याचेच हे लक्षणच.

school bus padmavat

करणी सेनेनं आता दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या आईवर चित्रपट काढणार असल्याचं म्हटलं आहे. करणी सेनेचे जयपूरचे जिल्हाध्यक्ष गोविंद सिंह खांगरोट यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. एकीकडे विरोध होत असतांना पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांचा त्याला भरपूर प्रतिसाद देखील मिळाला तर दुसरीकडे करणी सेना अजूनही सहमत नसून भन्साळींच्या आईवर चित्रपट काढण्याची घोषणा केली. त्यामुळे करणी सेनेवर देखील टीका होत आहे. महत्वाची बाब म्हणजे भन्साळी यांच्या आईवरील चित्रपटाचं पटकथा लेखन सुरु झाल्याचंही त्यांनी सांगितलं. या चित्रपटाचं नाव ‘लीला की लीला’ असेल, अशी घोषणाच करणी सेनेनं करुन टाकली. हा चित्रपट याचं वर्षी प्रदर्शित केला जाईल. चित्रपटाचं चित्रिकरण राजस्थानमध्ये होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत असल्याचही करणी सेनेनं म्हटलं आहे. पद्मावत चित्रपटाला सुप्रीम कोर्टाने देखील हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे करणी सेनेचा चित्रपटला विरोध अतिशोक्ती म्हणायला हरकत नाही. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पूर्वी गुजरातमधील राजपूत समाजाच्या शिष्टमंडळाने चित्रपट पाहून चित्रपटात काहीही चुकीचे नाही म्हणून सिद्ध केले होते. तरीदेखील करणी सेना माघार घ्यायला तयार नाही. त्यामुळे करणी सेना संजय लिला भन्साळी यांच्या आईवर चित्रपट काढून स्वतःच  पावित्र्य जपणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

padmavat

धार्मिक संघटना करत असलेल्या हिंसेमुळे युवकांचे करियर धोक्यात येत आहे. आता पद्मावती असो कि कोरेगाव-भीमा प्रकरण यात अनेक युवकांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे कुठेतरी वर्चस्ववादी युवकांचा वापर करून पाठीमागचे युद्ध खेळतात का? अशी शंका निर्माण होत आहे. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर अनेक राजकीय ,सामाजिक आणि धार्मिक संघटनांना पेव फुटला आहे. या हिंसाचाराच्या माधमातून अनेक संघटना, राजकीय नेते वर्चस्व प्राप्त करण्याच्या तयारीत आहेत.

Bhima-Koregaon violence
संग्रहित फोटो

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगली नंतर आता राजकीय दंगल पाहायला मिळत आहेत. अनेक राजकीय नेते २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असून नेत्यांची या स्टुडिओतून त्या स्टुडिओकडे लगबग सुरू असून शिवसेना,कांग्रेस, भारिप इतर राजकीय पक्षांनी भाजप विरोधात कंबर कसली आहे. आतापर्यंत अस्तित्वात नसलेल्या संघटना कोरेगाव भीमा च्या माध्यमातून स्वताच वर्चस्व प्राप्त कण्याच्या तयारीत आहेत. भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारामुळे दोन समाजात तेढ निर्माण झाला. त्यामुळे राजकीय हेतू नक्कीच यशस्वी झाल्याचे दिसते. सामान्य माणसाला प्रश्न नक्कीच पडतो. माणसातलं माणूसपण हरवलं का? कोरेगाव भीमा हिंसाचाराचा नंतर जातीयवाद निर्माण करून समाजात तेढ निर्माण करण्याचं प्रयत्न होत असतांना. नेता कितीही मोठा असो मात्र तो या माध्यमातून स्वार्थी राजकारण करत आहे. राजकीय नेत्यांनी भाषणातून घोषणा करून सामान्य लोकांना भडकावण्याचा यशस्वी प्रयत्न केला.