कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काजू बागायतदारांना फटका

बांदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले असून याचा फटका काजू बागायतदारांना बसला. वातावरणाचा देखील फटका बसल्याने आणि यावर्षी उशिरा सुरू झालेले उत्पन्न आणि त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद झालेली काजू खरेदी. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

जिल्ह्यात दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला ही परिसर काजू उत्पनामध्ये अग्रेसर आहेत. परंतु, यावर्षी काजू उत्तपनावर अवलंबून असलेले येथील अर्थकारण पूर्णपणे कोलमडून गेले आहे. वातावरणातील बदलामुळे मोहोर देखील जळून गेला. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच बदलून गेले. काजू बागायतीसाठी झालेला खर्च आणि यावर्षी मिळणारे उत्पन्न याचा मेळ न बसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

काजू विक्रीचा दर १०० रुपये प्रतिकिलोच्या खाली उतरल्याने येथील शेतकऱ्यांनी दर वाढीच्या अपेक्षेने काजूची विक्री न करता त्यांनी घरातच साठा करून ठेवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने भविष्यात काजू विक्री होणार की नाही याबाबत शंका आहे.