‘जनतेला मुख्यमंत्र्याकडून आश्वासनांचे गाजर’, गाजरांची माळ घालत मनसेचे आंदोलन

mns

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शहरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरात आंदोलन करण्यात आले. मनसेच्या नेत्यांनी गाजरांची माळ गळ्यात घालत मुख्यमंत्र्यांनी जनतेला गाजर दाखवण्याचे काम करू नये, असा आरोपही केला. शहरातील पाणी प्रश्न कधी सुटणार याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे म्हणत ‘जवाब दो मुख्यमंत्री’ असे आंदोलन मनसेने केले.

शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने कोणतेही काम करण्यात आलेले नाही. १९९२ पासून पाणीपुवठ्यासाठी एकही नवीन पाईप लाईन टाकण्यात आलेली नाही. असे असतांना नवीन पाणी पुरवठा योजनेचे भुमीपूजन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. या योजनेला मंजूरीच नसताना या योजनेचे काम सुरू झाल्याचा देखावा करण्यात येतोय. औरंगाबाद महानगर पालिकेच्या तोंडावर अशा प्रकारे जनतेला गाजर दाखवण्याचे काम शिवसेना करत असल्याचा आरोपही मनसेने केला.

सुमारे ९ महिन्यांपासून पाणीपुरवठा योजनेसंदर्भात केवळ कागदोपत्री घोडे नाचवले जात आहेत. प्रत्यक्षात जायकवाडीपासून काम सुरू करणे अपेक्षीत असताना केवळ नागरिकांच्या देखाव्यासाठी शहरात पाईप टाकण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोपही मनसेने केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमीत खांबेकर, जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, आशिष सुरडकर आदींची या वेळी उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या